आपुलकीचे गुरू. चार स्तंभ, चार शिकवणी, एक आयुष्य. | by Shrungal Kulkarni | Nov, 2025

प्रत्येकाच्या जीवनात स्नेह मूलभूत असतो — आपल्यासाठीही आणि इतरांसाठीही. मनुष्याच्या आयुष्याचा पाया कुठे रचला जातो, हे विचारात घेतलं तर एकच शब्द मनात येतो — आपुलकी. ज्याच्या मुळाशी प्रेम, स्नेह, आधार आणि विश्वास असतो. आणि या सगळ्या भावनांना आकार देणारे चार अनमोल स्तंभ — आई, वडील, गुरु आणि मित्र.
आई — जन्माची पहिली गुरू
मनुष्याचा पहिला श्वास ज्या कुशीत उघडतो ती आई हीच त्याची पहिली गुरू. “आई” हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला, तरी या शब्दात संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. लेकराला उशीर होऊ नये म्हणून स्वतः लवकर उठून सगळी कामे पूर्ण करणारी — ती आई. लेकराला गरम जेवण मिळावे म्हणून स्वतः भूक सहन करणारी — ती आई. घरातील प्रत्येक व्यक्तीचे नेहमी हित पाहणारी, तेही मनापासून आणि काहीही अपेक्षा न ठेवता — ती आई. आई असतेच मायाळू, जीव लावणारी, पण म्हणून तिला दुखावण्याचा अधिकार आपल्याला नाही. आई कुठे काय करते हे म्हणणे सोपे आहे, पण जी कामे न दिसून झाल्यासारखी वाटतात — ती आई करते. आईचं अस्तित्व म्हणजे उबदार सावलीसारखं — जोवर ती आहे, तोवर आयुष्याच्या उन्हाचा त्रास कमी जाणवतो.
वडील — आधार, शिस्त आणि धडा
आईनंतर येतो दुसरा अढळ स्तंभ — वडील. वडील जरी स्वतःला कठोर दाखवत असले तरी त्यांच्या पेक्षा दयाळू कोणीही नाही. एक वडीलच असे असतात जे स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करून कुटुंबाच्या आनंदासाठी प्रयत्न करतात. त्यांचा रागही प्रेमाचा असतो. त्यांनी केलेली धडपड व्यर्थ जाऊ नये म्हणूनच तो राग असतो. ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे.
ते रागावले म्हणून त्यांच्यावर रुसून बसणे योग्य नाही. मुलांनी जगाशी सामना करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं — म्हणूनच ते थोडं कठोर होतात. आई आणि वडील हे आयुष्यातले ते दोन स्तंभ आहेत जे आपल्या जीवनगाडीला महामार्गावर धावायला बळ देतात. सुखदुःखात हक्काने सोबत उभे राहणारे, आपल्या यशात आपल्या पेक्षा अधिक आनंद मानणारे आणि कठीण काळात मजबूत आधार देणारे — असे हे आई-वडील आपले खरे गुरू आहेत.
गुरु — ज्ञानाचा दीपस्तंभ
तिसरा स्तंभ आहे गुरु — ज्यांच्यामुळे अंधारात दिशा मिळते. गुरु फक्त शिकवतात असं नाही; ते माणसाच्या मनात ज्ञानाचा दिवा लावतात. गुरु म्हणजे फक्त धडा सांगणारी व्यक्ती नव्हे; तर जीवनाला अर्थ देणारा मार्गदर्शक.
खरा गुरु: शिक्षण, अनुभव, शहाणपण — या तीनही गोष्टी जिथे एकत्र येतात, तिथे ‘गुरु’ निर्माण होतो.
मित्र — मनाचा हात, आयुष्याचा खरा साथी
आणि चौथा आधार — मित्र .मित्र म्हणजे मन व्यक्त करण्याचं सर्वात मुक्त स्थान. ज्या मित्रांशी मनमोकळेपणाने गप्पा मारता येतात, ज्यांचा आधार नेहमीच आपल्याला जाणवतो — असा एक खरा मित्र आयुष्यात असावा. मानसिक आधाराची प्रत्येक माणसाला गरज असते. काही गोष्टी आपण आई-वडिलांना सांगू शकत नाही; पण मित्रांशी सहज शेअर करतो. ज्याच्यासोबत हसताना वेळ कसा जातो कळत नाही, आणि रडताना सुद्धा एकटेपण वाटत नाही — तोच खरा मित्र. जे आपल्या प्रतिभेची खरी प्रशंसा करतील आणि आयुष्यभर सोबत चालतील. जे कामालाही येतील आणि अधिकाराने सल्ला देतील. ज्यांच्याकडे पाहून आपणही अभिमानाने म्हणू, “He is my brother, from another mother.”
असं म्हणतात — आयुष्य खूप काही शिकवतं. मनुष्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट जी अढळते ती गुरु-तुल्य असते. पण अशी काही माणसं लाभली, की आयुष्याने दिलेल्या शिकवणीचं सोनं होतं. प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक व्यक्ती आयुष्यात गुरुच ठरते.
समारोप — आयुष्यही एक गुरुच आहे
प्रत्येक अनुभव शिकवतो, प्रत्येक माणूस काहीतरी देऊन जातो, आणि प्रत्येक अडचण एक नवा अध्याय उघडते. आयुष्यात ज्या माणसांनी आपल्याला घडवलं — त्यांचे ऋण शब्दांत भागवता येत नाही, फक्त मनापासून मानता येतं.
आपुलकीचे हे गुरु — शोधून, जपून, आणि प्रेमाने सांभाळून ठेवा.
लेख आवडला असेल तर ‘Follow’ करा. तुमचे विचारही जरूर सांगा — मला वाचायला नेहमी आनंद होईल.

